

सांगली ः सर्व शिक्षा तथा समग्र शिक्षा अभियान दि. 31 मार्चपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 91 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारीची वेळ आली आहे. दि. 1 एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती न मिळाल्याने ते सेवाबाह्य झाले आहेत. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर महिनाभरापासून आंदोलन सुरू केले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कामकाज विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांची नियुक्ती परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात आली होती. उच्चशिक्षित असलेल्या या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी नूतनीकरण दिले जात होते. डिसेंबरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने चार महिन्यांची नियुक्ती देण्यात आली होती; मात्र ती मुदत दि. 31 मार्चला संपल्यानंतर पुढील नियुक्ती देण्यात आली नाही. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत झेडपीत साधन व्यक्ती 53, एमआयएस समन्वयक 8, वरिष्ठ सहायक लेखा 9, डेटा एन्ट्री ऑपरेटर 8, कनिष्ठ अभियंता 5 आणि जिल्हास्तरीय कर्मचारी 8 असे एकूण 91 जण कार्यरत होते. या सर्वांना प्रतिमहिना सरासरी 33 हजार रुपये मानधन मिळत होते.