Sangli Mayor Election : कचखाऊ काँग्रेस एकाकी; राष्ट्रवादी सत्तेला चिकटली

नामुष्कीजनक पराभवाचे भाजपकडून बिनविरोध उट्टे; राजकारण्यांचा खेळ पाहणे मतदारांच्या नशिबी
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

उध्दव पाटील

सांगली : महापौर व उपमहापौर निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय हे काँग्रेस नेत्यांच्या कचखाऊ राजकारणाचे स्पष्ट द्योतक ठरत आहे. काँग्रेस सोडून अन्य सर्व पक्षांना सत्तेत घेणार, अशी उघड भूमिका भाजपच्या नेत्यांकडून मांडली जात असताना, काँग्रेसकडून मात्र निवडणूक न लढवता बिनविरोध प्रक्रियेला प्रत्यक्ष सहकार्य करण्यात आले. खरे तर भाजपच्या आव्हानाला थेट भिडण्याऐवजी बाय देऊन काँग्रेस नेत्यांनी कमकुवतपणा दाखवला. मग लढण्याची ताकद नाही, की अन्य काही कारणे आहेत, असा प्रश्न पडतो आणि तर्क-वितर्क सुरू होतात. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही जिंकण्याची गरज म्हणून निवडणुकीत भाजपविरोधाचा मुखवटा अवलंबला आणि नंतर मात्र सत्तेला जाऊन चिकटले. भाजपनेही राष्ट्रवादीचा पद्धतशीर उपयोग करून घेत गेल्यावेळच्या नामुष्कीजनक पराभवाचे बिनविरोध उट्टे काढले. आता मतदारांच्याही हाती राजकारण्यांचा हा खेळ पाहण्याव्यतिरिक्त काही उरलेले नाही.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीने अनेक रंग दाखवले. राज्यातील सत्तेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना एकत्र आहेत. पण येथील राजकीय, सामाजिक परिस्थिती वेगळी. त्यामुळे राष्ट्रवादीने इथे भाजपबरोबर जाण्यात इंटरेस्ट दाखवला नाही. उलट काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर अघोषित समझोता करून आपला सामाजिक बेस पक्का केला. एकूणच मत्तांचा गठ्ठा फोडण्यासाठी भाजपचीही तीच राजकीय खेळी असणार, हेही जाणवत होते. काही स्थानिक संदर्भांमुळे भाजपने शिवसेनेला जवळ केले नाही. त्यामुळे राज्याच्या सत्तेत महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना यांनी सवतेसुभे निर्माण करून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. अगदी सुरुवातीला भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र ती एकतर्फी तर राहिलीच नाही, उलट अत्यंत अटीतटीची झाली. निकालांनी ते स्पष्ट केले आहेच.

संधिसाधूपणा समोर

महापालिका निवडणुकीचा निकाल आला. भाजपला 39, काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भाजपचे बहुमत अवघ्या एका जागेने हुकले. मतमोजणीच्या दिवशीच भाजप नेत्यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून बहुमताची जुळणी केली. पण या जुळणीनंतरही स्थायी समितीत बहुमत अडते म्हटल्यावर भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाशी बोलणी केली, तसे राष्ट्रवादी पक्षही सत्तेत जाण्यासाठी जणू आतुरलेलाच होता. निवडणुकीतील त्यांचा भाजप विरोध हे जणू काही त्यांनी घेतलेले सोंग होते. त्या सोंगाचा त्यांना फायदाही झाला. नव्हे, त्या फायद्यासाठीच त्यांनी हे सोंग घेतल्याचे स्पष्ट होते. महापालिकेत बहुमताचा आकडा 40 असताना आता भाजप-राष्ट्रवादी युतीकडे 55 संख्याबळ झाले. त्यासरशी भाजपने शिवसेनेला बाजूला सारले. भाजपविरोधी लढलेल्या राष्ट्रवादीचा आणि हाती घड्याळ लागल्यावर शिवसेनेला बाजूला केलेल्या भाजपचा संधिसाधूपणा यानिमित्ताने समोर आला.

सभागृहात कसे भिडणार?

काँग्रेस सोडून अन्य सर्व पक्षांना सत्तेत घेणार, अशी उघड भूमिका भाजपचे वजनदार नेते मांडत आहेत. म्हणजेच महापालिकेत काँग्रेसला एकाकी पाडण्याचा डाव भाजप खेळत असताना केवळ भाजप नेत्यांनी आवाहन केले म्हणून बिनविरोध प्रक्रियेला सहकार्य करणे, हे काँग्रेसप्रेमींना रुचलेले नाही. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवली असती, तर काँग्रेसचा पराभव अटळ होता. पण आव्हानाला थेट भिडण्याऐवजी बिनविरोधचा मार्ग स्वीकारून कमकुवतपणा दाखवणे काँग्रेसप्रेमींना कसे रुचेल? महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्ष आहे. थेट भिडण्याची मानसिकता नसलेली काँग्रेस महापालिकेच्या सभागृहात भाजपला कशी भिडणार, हा प्रश्नही उपस्थित होतो. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची भूमिका यापुढे काय असणार, नेते कितपत लढाऊ बाणा दाखवणार, यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून असेल. काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवून ठेवणे, वाढवणे यासाठी भाजपशी भिडण्याशिवाय गत्यंतर दिसत नाही.

पाच वर्षांची ती भळभळती जखम...

महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. भाजपचे 41 आणि अपक्ष 2 यासह एकूण संख्याबळ 43 होते. मात्र महापौर पदाच्या दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीत (दि. 23 फेब्रुवारी 2021) भाजपाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. अंतर्गत फूट, बंडखोरी आणि त्यावेळी एकसंध राष्ट्रवादी व काँग्रेसची राजकीय खेळी, यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदूम यांचा पराभव झाला होता. भाजपची 7 मते फुटली होती. भाजपच्या पाच नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केले होते, तर दोन नगरसेवकांनी अनुपस्थित राहून महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली होती. त्या नामुष्कीजनक पराभवाची भळभळती जखम पाच वर्षे ओली होती. ती आता बिनविरोध निवडणुकीने एकदम भरून आली आहे. फेब्रुवारी 2021 च्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाची जुळणी तेव्हाच्या एकसंध राष्ट्रवादीने केली होती. आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या साहाय्याने भाजपने महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. त्यावेळी पराभव झालेले धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम हे आता अनुक्रमे महापौर, उपमहापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news