

ईश्वरपूर : डिलिमिटेशनच्या (मतदारसंघ पुनर्रचना) मुद्द्यावर सत्ताधारी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारकडून नेमके कोणते ठोस आश्वासन घेतले आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे. पक्षाने तयार केलेल्या राजकीय मसुद्यात शक्तिपीठ महामार्गाबाबत स्पष्ट हमी आहे, की केवळ शब्दांची पेरणी आहे, हे वरिष्ठ नेत्यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. या पत्रकावर काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पवार आणि खरातवाडीचे उपसरपंच अर्जुन खरात यांच्याही सह्या आहेत.
वाळवा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत असून, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मार्ग काढावा
जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधून राजकीय समन्वय घडवून आणू शकतात; मग शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी ठामपणे चर्चा का केली जात नाही, असा सवाल जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे. राजकीय विषयांसाठी संवाद होतो, तर शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भवितव्याच्या प्रश्नासाठीही तितकाच पुढाकार घेतला पाहिजे. केवळ आंदोलनात सहभागी होऊन चालणार नाही, तर महामार्ग रद्द करण्याचा ठोस निर्णय सरकारकडून मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
विचारधारा व आघाडी धर्मावरून टीका
एकीकडे पुरोगामी विचारांची भाषा करायची आणि दुसरीकडे भाजपला पूरक ठरणाऱ्या भूमिका घ्यायच्या, हा दुटप्पीपणा किती दिवस चालणार, अशी टीका करत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून बंडखोरी झाली, तसेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसले. आघाडीतील पक्षांनी एकमेकांचे पाय खेचायचे आणि वरून पुरोगामी एकतेच्या गप्पा मारायच्या, हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान्य होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.