Sangli ZP Politics: काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना

जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग; भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sangli ZP
Sangli ZPPudhari
Published on
Updated on

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बुधवार, दि. 18 मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बहुसंख्य सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेमध्ये आघाडीची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 61 आहे. सत्तास्थापनेसाठी 31 सदस्यांची गरज आहे. महाविकास आघाडीचे 30 सदस्य निवडून आले आहेत. महायुतीकडे बहुमतासाठी आवश्यक असलेले 31 हे संख्याबळ आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. त्यामुळे भाजपसोबत सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील बहुसंख्य स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे.

दुसऱ्या बाजूला पाठिंब्यासाठी भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर राज्यस्तरावरून दबाव आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार हे दि. 18 मार्च रोचीच स्पष्ट होणार आहे.

36 सदस्य थेट बुधवारी येणार

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षासह राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या काही सदस्यांना शनिवारी रात्री अज्ञातस्थळी रवाना केल्याची खात्रीलायक माहिती आहे. काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादीचे एकूण 36 सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष, निवडीदिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 18) रोजी सकाळी थेट जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले जात आहे.

जिल्हा परिषदेमध्ये सत्तास्थापनेसाठी गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. प्रत्येक पक्षाकडून आपले संख्याबळ टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत आपले बहुसंख्य सदस्य अज्ञातस्थळी ठेवण्याची रणनीती अवलंबली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील सत्तेचे गणित आणखी रंगतदार झाले आहे.

निवडणुकीपूर्वी सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्याची ही पद्धत राज्याच्या राजकारणात नवीन नाही. यापूर्वीही विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. सदस्य फुटू नयेत आणि सत्तेची गणिते कायम राहावीत यासाठी पक्षांकडून अशा प्रकारची रणनीती अवलंबली जाते.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली सुरू राहणार आहेत. अंतिमक्षणी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य एकत्र राहिल्यास जिल्हा परिषदेमध्ये आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकते. सत्तास्थापनेत भाजपला धक्का बसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news