

कुपवाड : कोरेगाव-चुंब (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील मनोहर विठ्ठल ढाकणे या शेतकऱ्याचा १३ लाख ९९ हजार २५० रुपयांचा ९ हजार ३०० किलो बेदाणा परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसीतील कोल्ड स्टोअरेजच्या मालकासह दोघांविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्त कोल्ड स्टोअरेजचा मूळ मालक (पूर्ण नाव व पत्ता नाही) व देशभूषण कर्नाळे (रा. जैन गल्ली, कुपवाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादी सुधीर ढाकणे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे चुलते मनोहर विठ्ठल ढाकणे यांनी दि. २० एप्रिल २०२३ रोजी कुपवाड एमआयडीसीतील दत्त कोल्ड स्टोअरेजमध्ये (प्लाॅट नंबर जे-५१, ५२) त्यांच्या मालकीचा १३ लाख ९९ हजार २५० रुपये किमतीचा ९ हजार ३०० किलो बेदाणा भाडेतत्त्वावर ठेवला होता.
दत्त कोल्ड स्टोअरेजचा मूळ मालक (पूर्ण नाव व पत्ता नाही) व कुपवाडमधील देशभूषण कर्नाळे या दोघांनी ढाकणे यांना विश्वासात न घेता त्यांच्या परस्पर या बेदाण्याची विक्री केली. फसवणुकीचा हा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीस आला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.