Sangli News : कुपवाडमधील कंपनीची ९ लाखांची फसवणूक

मालाची परस्पर विक्री किंवा अपहार; ट्रक चालकासह चौघांवर गुन्हा
Financial Fraud
Financial Fraud(file photo)
Published on
Updated on

कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथील स्मार्ट पॅनेल इंडिया कंपनीतून मध्य प्रदेशातील शहाडोल येथील जिया एंटरप्रायझेस फर्निचर कारखान्याचे मालक आक्रम अन्सारी यांच्याकडे पाठविण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला ९ लाख ५२ हजार ३२० रुपयांचा प्लायवूडचा माल संबंधित पार्टीकडे न पोहोचवता त्याची परस्पर विक्री अथवा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रक चालकासह चौघांविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अरिहंत ट्रान्सपोर्टचे प्रतिनिधी संकेत तनपुरे, दोन अनोळखी इसम व ट्रक चालक (एमएच ४१ एयू २६७५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री संशयित स्मार्ट कंपनीत गेले. कंपनीचा माल मध्य प्रदेशात पोहोचविण्याची माहिती मिळाल्याचे सांगून त्यांनी ट्रक आणला. त्यानुसार कंपनीतील सुमारे ३० टन प्लायवूड ट्रकमध्ये भरून तो अन्सारी यांच्याकडे नेण्यासाठी रवाना झाले.

फिर्यादी रुकमुद्दीन घुडूसाहेब इनामदार यांनी २६ एप्रिल रोजी ट्रकचे लोकेशन तपासले असता तो चुकीच्या मार्गाने जात असल्याचे दिसून आले. त्यांनी ट्रक चालकाशी संपर्क साधला असता, ट्रकचे पासिंग करायचे असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर २८ एप्रिल रोजी अरिहंत ट्रान्सपोर्टच्या संचालकाने अगाऊ रकमेची मागणी केली. त्यावर संबंधित पार्टीकडे माल पोहोचल्यानंतरच पैसे देण्यात येतील, असे इनामदार यांनी सांगितले.

यानंतर ट्रक चालकाने त्याच्या दोन साथीदारांनी संगमनेर बायपास येथे दुसऱ्या ट्रकमध्ये माल भरून नेल्याची माहिती दिली. त्यानंतर चालकाचा मोबाईल बंद लागला. इनामदार यांनी पुणे येथील अरिहंत ट्रान्सपोर्टच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता तेथे अशी कोणतीही ट्रान्सपोर्ट कंपनी नसल्याचे आढळून आले. संबंधित माल पार्टीकडे न पोहोचवता त्याचा अपहार करून फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इनामदार यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news