Sangli News| ५९२ कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लावणार का?

उपमहापौर गजानन मगदूम : रोकडे यांच्या सहीने काढलेली ठेकेदारांची बिले वसूल करणार का?
Sangli municipal corporation |
Sangli municipal corporation |Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतरही त्यांनी हाताळलेल्या आणि मंजूर केलेल्या प्रकरणांवरील पुढील कार्यवाहीला आयुक्त संजीता महापात्र यांनी स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांनाही ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, रोकडे यांनी हाताळलेल्या ५९२ कोटी रुपयांच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पालाही ब्रेक लावणार का आणि त्यांनी मंजूर केलेले वेतन व ठेकेदारांची बिले वसूल करणार का, असा सवाल उपमहापौर गजानन मगदूम यांनी आयुक्तांना केला आहे. त्यामुळे रोकडे यांच्या प्रतिनियुक्तीचा मुद्दा आता नव्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

राहुल रोकडे यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतरही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. हा मुद्दा सोमवारी झालेल्या महासभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त महापात्र यांनी मंगळवारी आदेश काढून, रोकडे यांनी प्रतिनियुक्तीची मुदत संपल्यानंतर हाताळलेल्या अथवा मंजूर केलेल्या सर्व प्रकरणांच्या पुढील कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या कामांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे, प्रशासकीय मंजुरी आणि आर्थिक व्यवहारांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, एमआरडीपीच्या ५९२ कोटी रुपयांच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पावरून महापालिकेत प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा संघर्ष उफाळून आला आहे. अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनीच या प्रकल्पाचे विषयपत्र महासभेकडे अवलोकनासाठी पाठविले होते. मग आता आयुक्तांनी दिलेल्या स्थगिती आदेशानंतर या ५९२ कोटींच्या प्रकल्पालाही ब्रेक दिला जाणार का, असा थेट प्रश्न उपमहापौर गजानन मगदूम यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय, रोकडे यांच्या कार्यकाळात ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली तसेच कर्मचाऱ्यांचे वेतनही काढण्यात आले, ज्यावर त्यांचीच स्वाक्षरी आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीची मुदत संपल्यानंतर त्यांनी अदा केलेल्या या रकमांचीही प्रशासन वसुली करणार का, असा सवाल मगदूम यांनी आयुक्तांना केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.