

सांगली : शहरातील गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरातील गायत्री नगर गल्ली नंबर २ मधील एका बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ६२ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नीलेश दिनकर पाटील (वय ३३, सध्या रा. फ्लॅट नं. ३, वास्तुवरद अपार्टमेंट, गव्हर्न्मेंट कॉलनी, गायत्री नगर, मूळ रा. गुडाळ, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते रात्री १०:३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी नीलेश पाटील हे फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. या कालावधीत चोरट्याने मुख्य दरवाजाचा लोखंडी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची १७ ग्रॅमची सोन्याची साखळी, २० हजार रुपयांची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ७०० रुपयांचे चांदीचे तोडे, ५०० रुपयांचे पायातील पैंजण, ५०० रुपयांचे हातातील कडे आणि १ हजार रुपये किमतीचे चांदीचे तीन ब्रेसलेट असा एकूण ६२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.