आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथे ग्रामपंचायतीचा पाण्याचा एअर व्हॉल्व्ह बंद केल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात जोरदार वाद होऊन हाणामारी झाली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आटपाडी पोलिस ठाण्यात एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल हरुन इनामदार (वय २६, रा. करगणी) याने दिलेल्या पहिल्या फिर्यादीनुसार, घरासमोरील पाण्याचा एअर व्हॉल्व्ह बंद केल्याच्या कारणावरून सिकंदर आप्पालाल इनामदार, अमिना सिकंदर इनामदार, यास्मिन अमीर इनामदार व अमीर आप्पालाल इनामदार यांनी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मिनाज हारुण इनामदार यांना काठीने, तर समीर हारुण इनामदार याच्या हातावर अमिर इनामदार याने लोखंडी रॉडने मारल्याचा आरोप आहे.
दुसऱ्या बाजूने सिकंदर आप्पालाल इनामदार (वय ४७, रा. करगणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एअर व्हॉल्व्हचे पाणी भरण्यावरून समीर हारुण इनामदार, साहिल हारुण इनामदार, मिनाज हारुण इनामदार व हारुण मेहबूब इनामदार यांनी वाद घालत लाकडी काठीने पाठीवर मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यास आलेल्या अमीर व यास्मिन यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.