

- नंदू गुरव
सांगली शहराच्या आसपासची शहर अनेक क्षेत्रामध्ये बदललेली आहेत. सांगलीला बदलण्यासाठी मात्र भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत.चर्चा खूप होतात, आश्वासनांचा पाऊस पडतो, असे किती वर्षे म्हणायचे. पाच, दहा पंधरा वर्षानुवर्षे माणसे आमदारकी भोगतात, खासदारकी भोगतात. मंत्री होऊन मिरवतात. सर्वपक्षीय नेतेमंडळी नेटाने खोटं बोलतात. शुद्ध पाणी, चांगले रस्ते, गरजेनुसार वीजपुरवठा, शुद्ध हवा अशा मुलभूत गरजांबाबत बोंबाबोंब आहे. सांगली बदलत नाही हे दुखणे खूप खूप जुने आहे. एक एक समस्येचा आढावा आजपासून पुन्हा एकदा...
लोकशाहीचा मतदारराजा जेव्हा महापालिकेच्या कारभाऱ्यांना मतदान करायला घराबाहेर पडेल, तेव्हा त्याला खड्डे चुकवत, जीव वाचवत मतदान केंद्रापर्यंत जावे लागेल. धूळ इतकी जीवघेणी, की तोंडाला मास्क बांधून मतदान करायला जावे लागेल. धुळीनं दम लागेल, श्वास कोंडेल, पण त्याला मतदानाचे कर्तव्य पार पाडावेच लागेल. जागरुकपणे मतदान करा... असे आवाहन करणारी यंत्रणा बहुतेक खड्डे, धुळीपासून जागरुक राहून मतदान करा, असे सांगत असावी, असा ठाम समज सांगलीकरांचा झाला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत खड्डे आणि धुरळ्याचा प्रश्न कधीचाच गायब झाला आहे.
सांगली शहरात असा एकही रस्ता नाही, की जो खड्ड्यात अडकला नाही. एकही चौक असा नाही, की जिथं पाणी साचत नाही. एकाही रस्त्यावरून धूळ फुफ्फुसात न घेता जाता येता येत नाही. प्रचंड धुळीत सांगली शहर अडकले आहे. त्यावर कसलीही उपाययोजना नाही, की कार्यवाही नाही. महिनो न् महिने साऱ्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे आहेत तसेच आहेत. त्यात साधी खडी टाकायची जबाबदारीही पार पाडली जात नाही. लोकांना तर रस्ते इतके तोंडपाठ झाले आहेत, की डोळे झाकूनही ते खड्डा चुकवत गाड्या मारू शकतात. तेच ते खड्डे... तीच ती बेजबाबदार यंत्रणा.
‘मुख्यमंत्री येती शहरा तोची दिवाळी-दसरा’ असा अनुभव सांगलीकरांनी घेतला. मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरून जातील, त्या त्या रस्त्याचं नशीब फळफळलं. एरवी खड्ड्यांत कंबर मोडून घेतलेले आणि धूळ फुफ्फुसात घेऊन दमा झालेले सांगलीकर शिल्लक राहिलेल्या आवाजात खड्डे मुजवा... जीव वाचवा असे सांगून सांगून दमले. पण त्यांची चेष्टा करण्यापलीकडं यंत्रणेनं काहीही केलं नाही. पण मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर लगेच हेलिपॅडपासून ते स्टेशन चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांत खडी पडली, त्यावर डांबर पडलं, त्यावर बुलडोझर फिरला. मशीन लावून धूळही गायबकेली. रस्ता चकाचक झाला. मुख्यमंत्री आले, बोलले, परत फिरले. सांगली परत खड्ड्यांत अडकली. सांगलीकरांच्या फुफ्फुसात परत धूळ भरली.
हेच का विकासाचे मार्ग?
सांगली कॉलेज कॉर्नर ते चिंतामणीनगरचा पूल... हा रस्ता कधी चांगला होणार, असा सवाल हजारो वाहनधारक रोज विचारत आहेत. काळ्या खणीवरचा रस्ता चकाचक, पण आपटा पोलिस चौकीपर्यंत जाताना कंबर मोडते. तिकडे पंचशीलनगरचा पूल करायचं काम वर्ष झालं सुरू आहे, ते कधी पूर्ण होणार माहिती नाही. पूल पूर्ण होईपर्यंत जीव मुठीत धरून जायचे. लक्ष्मी मंदिर चौकापासून कुपवाडपर्यंत जाताना हाडांची चाळण होते. सिव्हिल हॉस्पिटल ते शंभरफुटी रस्त्यापर्यंत जाताना जीव घाबरायला होतो. कॉलेज कॉर्नरपासून टिंबर एरियात जाताना अपघाताची भीती आहे. मंगळवार बाजार ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जायचे कसे, हा सवाल आहे. कर्नाळ पोलिस चौकीपासून शिवशंभो चौकापर्यंत जाताना भयंकर त्रास सोसावा लागतो आहे. कॉलेज कॉर्नर ते पटेल चौकापर्यंत जाताना असाच त्रास होतो आहे. मिरज रोडवरून स्फूर्ती चौकाकडे जाणारा रस्ता कधी पूर्ण होणार माहिती नाही. शंभरफुटी रस्ता ते शामरावनगर आणि शामरावनगरच्या अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा कधी संपणार, त्याचा पत्ता नाही.