Sangli News : वाढीव वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त

स्मार्ट मीटर बसवूनही बिल दुरुस्तीस टाळाटाळ ; नागरिकांमध्ये तीव्र असंतोष
Electricity Bill Increase
Electricity Bill IncreasePudhari
Published on
Updated on

संदीप माने

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यात महावितरणकडून वीज मीटरचे रीडिंग घेणे बंद केले आहे. ग्राहकांना मात्र वीज बिले दिली जात आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही वाढीव बिले दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्राहकांच्या खात्यावर पैसे शिल्लक असतानाही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, ‘स्मार्ट मीटर बसवून चूक केली का?’ असा संतप्त सवाल ग्राहकांकडून केला जात आहे.

सुरुवातीपासूनच स्मार्ट मीटरला विरोध होता. मात्र, महावितरणने हा विरोध झुगारून मीटर बसविण्याची मोहीम राबविली. काही गावांत यावरून ग्राहक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादीही झाली. सध्या तालुक्यातील १ लाख ६५ हजार ग्राहकांपैकी सुमारे एक लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघातील ४८ गावांमध्ये ८० टक्के म्हणजेच ३६ हजार ग्राहकांकडे हे मीटर बसविण्यात आले आहेत.

रीडिंग बंद; ग्राहकांची गोची

स्मार्ट मीटरचे रीडिंग ऑनलाइन प्रणालीद्वारे घेतले जात आहे. तसेच वीजपुरवठा ऑनलाइन पद्धतीनेच बंद किंवा सुरू केला जात आहे. मात्र, ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर नाहीत, त्यांचे मीटर रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे. अशा ग्राहकांना सरासरी वीजबिले दिली जात आहेत. त्यामुळे ही बिले अवाजवी येत असल्याच्या तक्रारी आहेत.

‘स्मार्ट मीटर बसवा, मगच बिल दुरुस्त करू’

वाढीव बिलाबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना, ‘रीडिंग बंद आहे. आधी स्मार्ट मीटर बसवा, मगच बिल दुरुस्त करू,’ असे सांगितले जात असल्याचा आरोप आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही वेळेत बिल दुरुस्ती होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

माझ्या मीटरवरील वीजवापर आणि आलेल्या बिलामध्ये २०० युनिटचा फरक होता. स्मार्ट मीटर बसवून घेतल्यानंतर दोन महिने झाले, तरी बिल दुरुस्त झालेले नाही. उलट पुन्हा १८५ युनिटचे अंदाजे बिल पाठविण्यात आले असून, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही मोबाईलवर आली आहे.
- एक वीज ग्राहक, नेर्ले (ता. वाळवा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news