Sangli News : विश्रामबागमधील २२ गुंठे ओपन स्पेसचा बाजार

महापौरांनी दिले कागदपत्रे तपासणीचे आदेश : भटकी कुत्री, अतिक्रमणांसह नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
Sangli News
विश्रामबागमधील २२ गुंठे ओपन स्पेसचा बाजार
Published on
Updated on

सांगली : विश्रामबागमधील महिला महाविद्यालयाजवळ एका मंजूर रेखांकनातील २२ गुंठे ओपन स्पेसचा बाजार झाला असल्याकडे नागरिकांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांचे लक्ष वेधले. त्यावर कागदपत्रे तपासून महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही करा, असे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले. 'जनहित महापौर आढावा अभियाना'वेळी नागरिकांनी भटकी कुत्री, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे यांसह समस्यांचा पाढाच वाचला. या समस्या मार्गी लावण्याचे आदेश महापौरांनी दिले.

सोमवारी सांगलीतील प्रभाग समिती क्र. २ मधील प्रभाग क्र. १७ व १९ मध्ये महापौर सूर्यवंशी यांनी पाहणी व फिरती करून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाहणीदरम्यान विश्रामबाग येथील महापालिका मालकीच्या सुमारे २२ गुंठे भूखंडाच्या विक्रीबाबतचा मुद्दा नागरिकांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिला.

विश्रामबाग येथे १९६३ च्या दरम्यान प्लॉटिंगचे रेखांकन मंजूर झालेले आहे. मंजूर रेखांकनानुसार २ भूखंड महापालिकेला द्यायचे होते. त्यातील एक भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिलेला आहे. त्यावर प्रभाग समिती क्रमांक २ चे कार्यालय आहे. मात्र दुसऱ्या भूखंडाचा कब्जा महापालिकेला मिळालेला नाही. या २२ गुंठे जागेची परस्पर विक्री झाली, अशी तक्रार नागरिकांनी केली. रेखांकनातील रस्त्यालाही अद्याप महापालिकेचे नाव लागले नसल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौरांनी संबंधित कागदोपत्री माहिती घेतली. महापालिकेच्या मालकीचा स्पष्ट फलक लावण्याबाबत तसेच आवश्यक नोंदी व कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता, पार्किंग, भटकी कुत्री

शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने या परिसरातील स्वच्छता आणि पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न नगरसेवक युवराज गायकवाड तसेच नागरिकांनी मांडला. बाजाराच्या दिवशी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने स्वच्छता व्यवस्था सक्षम ठेवण्याबरोबरच पार्किंगचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. हनुमाननगर येथे सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आल्या. भटकी कुत्री पकडण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

धामणी रोड, सांगली येथील शाळा क्र. ७ ची देखील पाहणी करण्यात आली. यावेळी सभागृह नेते संदीप आवटी, प्रभाग समिती सभापती वैशाली राजू गवळी, लक्ष्मण नवलाई, युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, कीर्ती देशमुख, अलका ऐवळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक तसेच उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त विद्या पाटील, प्रभाग समिती क्र. २च्या सहायक आयुक्त महादेवी केरिपाळे, स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, याकुब मद्रासी, नगर अभियंता महेश मदने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news