नागज : भरधाव कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अभिजित हणमंत मराठे (वय 25, रा. चोरोची ) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना विजापूर-गुहागर राज्यमार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
भरधाव कार (एम.एच.ई.आर.6589) ही जतहून नागजमार्गे तासगावकडे निघाली होती. दरम्यान चोरोची गावाजवळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोटारसायकल (एम.एच.10 सी.पी.6195) वरुन निघालेल्या अभिजित मराठे याला या कारने भीषण धडक दिली. या अपघातात अभिजित मराठे याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरात होती की मोटारसायकलीचा चक्काचूर झाला. मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी झाली. सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही.
अभिजीत मराठे हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. त्याच्या अपघाती निधनामुळे चोरोची गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.