Sangli News : अंधारातून खड्डे चुकवण्याची कसरत

कधी जागा होणार बांधकाम विभाग?
Chintamaninagar Railway Bridge
सांगली : चिंतामणीनगर पूल नव्हे, खड्डे पूल. येथे ये - जा करताना खड्डे चुकविण्याची कसरत नेहमीच करावी लागते.
Published on
Updated on

नंदू गुरव

सांगली : चिंतामणीनगरच्या रेल्वे पुलाचे पारायण काही संपायला तयार नाही. जुना पूल पाडण्याच्या निर्णयापासून ते तो पाडून नवीन पूल उभा राहीपर्यंत या पुलाने हजारो वाहनधारक आणि भोवताली राहणाऱ्या उपनगरांतील लोकांना प्रचंड त्रास दिला. हा त्रास अजूनही संपायला तयार नाही. अजून पुलाचे रितसर उद्घाटन व्हायच्या अगोदरच पुलावरच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. पुलावर अजूनही विजेची सोय नाही. अंधारातून खड्डे चुकवत पुलावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे. पण याचे कसलेही सोयरसुतक ना नेत्यांना आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाला.

बांधकाम विभाग काय करतो?

चिंतामणीनगरचा जुना रेल्वे पूल दुहेरीकरणासाठी पाडला आणि नंतर नवीन पूल उभारण्याचे काम इतके रखडले, की सांगलीकरांना जुन्या पुलाचे वर्षश्राध्द घालावे लागले. दीड ते दोन वर्षांनंतर हा पूल अखेर उभा राहिला. नवीन पूल झाला तरी, या राज्यमार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो वाहनधारकांचा त्रास संपला का? तर नाही. अजूनही या पुलाचे अधिकृत उद्घाटन व्हायचेच आहे, पण वैतागलेल्या वाहनधारकांनी कशाचीही वाट न बघता वाहतूक सुरू केली आणि तेव्हापासून आजपर्यंत या पुलाची राहिलेली कामे रखडलेलीच आहेत.

या पुलाच्या रस्त्याचे काम इतके निकृष्ट झाले की, त्याला जागोजागी खड्डे पडले. इतके मोठे खड्डे, की त्यात पाणी साचून अपघात व्हायला लागले. हे खड्डे मुजवा, असे सांगण्यासाठी नागरिकांना पुन्हा आंदोलनाचे इशारे द्यावे लागले. खड्ड्यात कशीबशी माती-खडी टाकून ते मुजवायची नाटकं करण्यात आली; पण पावसानं ही नाटकं अक्षरश: चव्हाट्यावर आली. एका पावसात पुन्हा खड्डे होते तसे झाले. आजही या पुलावरून जाताना खड्डे चुकवतच जावे लागते. लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कधी तरी या पुलावरून प्रवास करून परिस्थिती पाहावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news