

सांगली : संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंतामणीनगर येथे तरुणांच्या टोळक्याने सोमवारी सायंकाळी रिक्षा स्टॉपजवळ धिंगाणा घातला. ज्येष्ठांसाठी बसवण्यात आलेली बाकडी फोडून टाकली. यानंतर मंगळवारी सकाळी पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दहशत माजवणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे. महापालिकेकडून उभारण्यात आलेली पाच ते सात बाकडी या प्रकारात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दररोज सायंकाळी चिंतामणीनगर, घनश्यामनगर, संजयनगर आणि जासूद मळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येत असत; मात्र नशेखोरांच्या दमदाटीमुळे त्यांना आता तिथे बसणेही कठीण झाले आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने संजयनगर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी बसवेश्वर स्वामी, दत्तकुमार ढोले, नंदकुमार चव्हाण, श्याम वांगीकर, प्रा. पतंगराव जगताप, वसंत इंगळे, सुरेश देसाई, भीमराव भगत आदी उपस्थित होते.
ज्येष्ठांचे निवेदन
चिंतामणीनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने पोलिस निरीक्षक कदम यांना निवेदन देण्यात आले. नशेखोर तसेच दहशत माजवणाऱ्या तरुणांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी परिसरात वाढत चाललेला तरुणांचा उच्छाद, ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास, याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर आणि तातडीची पावले उचलावीत, अशी भूमिका मांडली.