

जत : आजोळी आलेल्या दोन वर्षीय जुळ्या भावांपैकी एकाचा शेततलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जत तालुक्यातील टोणेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत दुसरा भाऊ गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे टोणेवाडी आणि किडेबिसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्लोक अमोल घेरडे (वय 2, रा. किडेबिसरी, ता. सांगोला) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे, तर शौर्य अमोल घेरडे (वय 2) याच्यावर उपचार सुरू आहेत. श्लोक आणि शौर्य यांची आई सपना घेरडे काही दिवसांपूर्वी माहेरी भारत मोतीराम टोणे यांच्याकडे आल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन्ही जुळे भाऊ घरासमोरील अंगणात खेळत होते. खेळता खेळता ते जवळच बांधकामासाठी पाणी साठवण्याकरिता तयार केलेल्या शेततलावाजवळ गेले आणि दुर्दैवाने पाण्यात पडले.
दोघेही पाण्यात पडल्याचे परिसरातील एका लहान मुलीच्या लक्षात आले. तिने तातडीने आरडाओरडा करून ही बाब घरातील सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली. नातेवाईकांनी धाव घेत दोघांनाही पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, श्लोकचा वाटेतच मृत्यू झाला. शौर्य सांगोला येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. जत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.