

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 15) प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार शरद पवार यांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा होणार आहेत.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा आटपाडी येथे होणार आहे. पोलिस ठाण्याजवळील बचत धाम मैदानावर दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे. तसेच शिराळा विधानसभा मतदारसंघाचे महायुती (भाजप)चे अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेठ येथे दुपारी 12.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित आर. आर. पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार तासगाव दौर्यावर येत आहेत. तासगाव शहरातील सिद्धेश्वर मंदिर चौकात सकाळी 10 वाजता ही सभा होईल.