Chemist Strike : ऑनलाईन विक्री बंद करा, अन्यथा बेमुदत संप

सांगलीत औषध दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; 4200 दुकाने बंद
Chemist Strike
ऑनलाईन विक्री बंद करा, अन्यथा बेमुदत संप
Published on
Updated on

सांगली : औषध विक्रेता संघटनांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर दुकानदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे नेते विजय पाटील यांनी दिला. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

जिल्ह्यातील सुमारे 4 हजार 200 औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्च्यात सहभाग घेतला.विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रारंभ झाला. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

मोर्चात औषध विक्रेत्यांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चासमोर विजय पाटील सोमनाथ खराडे, अनुराधा माने, सागर साठे, भरत सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात सहभाग घेत खासदार विशाल पाटील, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी विजय पाटील म्हणाले की, आजच्या संपाला संपूर्ण देशभरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत संप पुकारण्यात येईल. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, या न्याय्य मागण्या असून, याबाबत आपण संसदेत आवाज उठवू. राजू शेट्टी म्हणाले की, ऑनलाईनमुळे ड्रग्जचा धोका वाढला असून, यावर तत्काळ बंदी आणली पाहिजे.

यावेळी पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेटे, जिल्हाध्यक्ष भरत सावंत, सचिव सागर साठे, खजिनदार सचिन सकळे, उपाध्यक्ष गणेश कोळसे व प्रकाश सूर्यवंशी, सहसचिव राजेंद्र केरीपाळे, नीलेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news