

वारणावती : चांदोली धरण तसेच अभयारण्य पर्यटकांसाठी पावसाळ्यामुळे बंद असले तरी, चांदोली परिसरातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा चांदोलीकडे वाढू लागला आहे. पावसामुळे चांदोलीचे सौंदर्य फुलले आहे.
चांदोली धरण तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यान ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्य यांचा समावेश होतो. एकूण जंगल क्षेत्र 1165.56 चौरस कि.मी. आहे. यापैकी बफर झोन क्षेत्र 565.45 चौरस कि.मी., तर कोअर भाग 600 चौरस किलोमीटरचा आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वर्ल्ड हेरिटेज साईट, महत्त्वाचा पक्षी अधिवास आणि बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट म्हणून सुद्धा जगभरामध्ये ओळखला जातो. तीन हजार ते पाच हजार मिलिमीटर येथील पावसाचे प्रमाण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी पावसाळ्यात येथील पर्यटन बंद केले जाते. चांदोली धरण तसेच अभयारण्य ही प्रमुख पर्यटनस्थळे जरी बंद असली तरी, चांदोली परिसरात इतर अनेक नयनरम्य पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा आस्वाद पर्यटक घेऊ शकतात.
चांदोली येथील वन्यजीव अभ्यासक प्रणव महाजन म्हणाले, पर्यटकांना पावसाळ्यामध्ये चांदोली परिसरातील अनेक ठिकाणे बघण्यास वाव आहे. यामध्ये उदगिरी येथील जंगल आणि देवीचे मंदिर, कांडवण धरण बोटिंग, गुढे पाचगणीचे पठार, शेवताई मंदिर परिसर, उदगिरीचे पठार, उदगिरी पठारावरील गुहा, उखळूचा धबधबा, उदगीरचा धबधबा, देवराई आदी ठिकाणे पर्यटकांना गाईड सोबत घेऊन वन विभागाच्या परवानगीने अनुभवता येतात. जंगलभ्रमंती करत असताना पर्यटकांना जागतिकदृष्टीने महत्त्वाचे आणि प्रदेशनिष्ठ प्रकारचे पक्षी, अनेक औषधी वनस्पती, तृणभक्ष्यी प्राणी यांचे दर्शन होत आहे. या प्राण्यांमध्ये सांबर, भेकर, रानडुक्कर, गवे, ससे, उदमांजर, शेकरू, तसेच पक्ष्यांमध्ये ब्लॅक बर्ड, हॉर्नबिल, गरुड आणि सापांमध्ये हरणटोळ, अजगर, नाग, गवत्या, चापडा, मांजर्या साप आदी दृष्टीस पडतात.