

सांगली ः चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. 34 टीएमसी क्षमतेचे धरण 93.19 टक्के भरले आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात आणि कोयना, चांदोली धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चांदोली धरणाचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवला आहे. परिणामी, कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आज मंगळवारी कृष्णा नदीची येथील पातळी तीस फुटापर्यंत जाईल, असा पाटबंधारे विभागातील अधिकार्यांचा अंदाज आहे. जुलै, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ओढ दिलेल्या पावसाने दोन दिवसापासून चांगला जोर धरला आहे. रविवारी रात्री सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सोमवारीही दिवसभर पाऊस सुरू होता.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून सायंकाळी पाच वाजता 5000 असणारा विसर्ग वाढवून 10,000 क्युसेक करण्यात आला. विद्युतगृहातून सोडलेला 1630 क्युसेक विसर्ग कायम आहे. त्यामुळे एकूण 18,630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाऊस वाढत राहिल्यास व पाण्याची आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल, असे वारणा जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठपर्यंत पूर्ण झालेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - 11 (272.9), जत 6.4 (260.2), खानापूर-विटा 1.6 (220.5), वाळवा-इस्लामपूर 10.2 (394.6), तासगाव 3.6 (277.6), शिराळा 24.5 (944.7), आटपाडी 2.2 (251.4), कवठेमहांकाळ 4.1 (257.7), पलूस 7 (347.3), कडेगाव 3.5 (271.5).