Sangli News : सेंट्रल वेअरहाऊसमधील माथाडी कामगारांना ५० टक्के वेतनवाढ

४० वर्षांचा संघर्ष यशस्वी; नवीन ठेकेदारासोबत झालेल्या मध्यस्थीनंतर शिक्कामोर्तब
Mathadi Workers
Mathadi WorkersFile Photo
Published on
Updated on

सांगली : मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊसमधील माथाडी कामगारांच्या गेल्या ४० वर्षांपासून चाललेल्या प्रदीर्घ आणि अखंड संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे. नवीन ठेकेदारासोबत झालेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर कामगारांना तब्बल ५० टक्के वेतनवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील माथाडी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक वेतनवाढ मानली जात आहे, अशी माहिती कामगार नेते हरिदास लेंगरे यांनी दिली.

लेंगरे म्हणाले, मिरज वेअरहाऊसमध्ये माथाडी कामगारांच्या पिढ्यान्‌ पिढ्या कष्ट करत आहेत. 'महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९' मधील कलम ३२ नुसार कामगारांचे वेतन आणि सेवा अटी ठरवण्याचा अधिकार माथाडी बोर्डाला आहे. सुरुवातीच्या काळात येथे बोर्डात नोंदणी नव्हती, तर नंतर नोंदणी होऊनही वेतन दर निश्चित झाले नव्हते. याचा गैरफायदा घेत ठेकेदारांकडून कामगारांच्या पगारात कपात करून आर्थिक शोषण केले जात होते.

ठेकेदारांच्या या अन्यायाविरोधात कामगारांनी हरिदास लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी मंडळाकडे दाद मागितली. पुणे विभागीय आयुक्तांसमोर झालेल्या सुनावण्यांनंतर माथाडी बोर्डाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दरवाढीचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, ठेकेदाराने कामगारमंत्र्यांकडे दाद मागून १५ एप्रिल २०२६ रोजी या आदेशाला स्थगिती मिळवली. या स्थगितीविरोधात कामगार संघटनेने थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर लढा सुरू ठेवला.

मध्यस्थीचा मार्ग अन् आनंदाश्रू

उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच, नवीन ठेकेदाराने २६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यस्थीचा मार्ग स्वीकारत कामगारांना ५० टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले. गेल्या ४० वर्षांत वडिलांना जो न्याय मिळाला नाही, तो सततच्या पाठपुराव्यामुळे आम्हा कामगारांना मिळाला, अशी भावना व्यक्त करताना अनेक कामगारांना अश्रू अनावर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news