

येडेनिपाणी : भरधाव वेगातील कारचा टायर फुटल्याने कार पलटी होऊन दुसऱ्या कारवर जाऊन धडकल्याने दोन्ही कारमधील सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी येडेनिपाणी फाट्याजवळ घडला. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्तांची नावे समजू शकली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून व कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कार (एमएच १० बीएम ७०८०) ही कोल्हापूरहून कराडच्या दिशेने चालली होती. येडेनिपाणी फाट्याजवळ हॉटेल शिवसाईसमोर या कारचा पुढील टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून ही कार तीन-चार पलट्या खात दुभाजकावरून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर जाऊन कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कारला (आएनडी २४ बीएच ७५६१एल) धडकली. या अपघातात कारमधील चौघेजण, तर दुसऱ्या कारमधील दोघेजण असे सहा जण जखमी झाले. जखमी हे खानापूर तालुक्यातील दिघंची व मुंबई येथील असल्याचे समजते. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नव्हती. घटनास्थळी आजुबाजूच्या लोकांनी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. जखमींवर कराड येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.