

कोकरूड : पुण्याहून कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे गणेशोत्सवासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या मोटारीस येळापूर (ता. शिराळा) येथे शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार रस्त्यालगतच्या सुमारे १० फूट खोल नाल्यात उलटली. या अपघातात दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुष अशा एकाच कुटुंबातील तब्बल सात जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील एक कुटुंब गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी कुडाळकडे मोटारीतून (क्र. एमएच १४ एलए ०९३१) प्रवास करत होते. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हे वाहन शिराळा तालुक्यातील येळापूर परिसरात आले असता चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे १० फूट खोल नाल्यात थेट उलटली.
अपघाताचा भीषण आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याने स्थानिकांनी अत्यंत वेगाने मदतकार्य राबवले. दरम्यान, या अपघाताची नोंद शनिवारी सायंकाळपर्यंत कोकरूड पोलिसात नव्हती. त्यामुळे जखमींची नावे तसेच त्यांच्या दुखापतींचे नेमके स्वरूप तत्काळ समजू शकले नाही.