

सांगली : ‘मी पत्रकार आहे, माझ्याकडे तुमच्याविरुद्ध तक्रार आलेली आहे. तुमची व तुमच्या पत्नीची बदनामी थांबवायची असेल, तर मला दहा लाख रुपये द्या. मी प्रकरण मिटवून घेतो’, असे म्हणून पैशाची मागणी केल्याची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. याप्रकरणी अभिजित जालिंदर बसुगडे (वय 45, रा. शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्यावर सोमवार, दि. 16 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उद्योजक विक्रम दिनकर पाटील (वय 40, रा. अजिंक्यनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटील यांचा साखरेचा व्यापार आहे. 13 फेब्रुवारी रोजी ते येथील एका हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी बसुगडे तेथे आला. त्याने पाटील यांच्याकडे जाऊन पाटील यांना, मी पत्रकार आहे. माझ्याकडे तुमच्याविरुद्ध तक्रार आली आहे, असे सांगितले.
या प्रकरणात मी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी रणजित विलास जाधव (रा. इचलकरंजी) यांना सांगलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसविणार आहे. तुमच्या शासकीय नोकरीतील पत्नीविरोधात हे उपोषण असेल. यातून तुमची व तुमच्या पत्नीची मोठी बदनामी करणार आहे. हे थांबवायचे असेल, तर तुम्ही मला दहा लाख रुपये द्या. मी हे प्रकरण मिटवून घेतो, असे म्हणत त्याने पैशाची मागणी केली. पाटील व त्यांच्या पत्नीची बदनामी करण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल बसुगडे याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.