

तासगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने सतरा प्रवाशांना घेऊन जाणारी बस विहिरीत कोसळता-कोसळता वाचली आणि मोठा अनर्थ टळला. सर्व सतरा प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली.
कराड-तासगाव रस्त्यावर तासगाव आगाराच्या चिंचवड - तासगाव बसबाबत ही घटना घडली. हा अपघात मंगळवार, दि. 17 जूनरोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, येळावी (ता. तासगाव) हद्दीतील निळकंठ बंगल्याजवळ दुपारच्या सुमारास चिंचवडहून तासगावकडे येणार्या बसचा (क्र. एमएच 10 डीटी 3995) चालक आशिक जगन्नाथ सुतार (वय 35, रा. तुंग) यांचे बसवरील नियंत्रण सुटले व बस वेगाने रस्त्यालगतच्या नाल्यातून थेट विहिरीच्या दिशेने गेली.
परंतु बसची चाके नाल्यात अडकल्याने बस विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन पाण्यात कोसळता कोसळता वाचली. तत्काळ तासगाव आगाराच्या अधिकार्यांचे पथक अपघातस्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसबाहेर काढण्यात आले. 14 जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले, तर तीन गंभीर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने राजमुद्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बसेस भाड्याने घेतलेल्या आहेत. त्यावरील चालक आणि वाहक हे राजमुद्रा कंपनीचे आहेत. अलीकडच्या काळामध्ये झालेले बहुतांशी अपघात भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी बसचे झालेले आहेत. या कंपनीने चालकांना प्रशिक्षण दिलेले आहे की नाही याची खातरजमा होत नाही. यामुळेच चालकांककडून असे अपघात वारंवार होत आहेत. एकूणच खासगी चालकच एसटी प्रवाशांच्या जिवावर उठले आहेत अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
घटनेनंतर अपघातस्थळी स्थानिकांचा मोठा जमाव जमा झाला होता. संतप्त प्रवाशांनी यावेळी चालकाला धारेवर धरत मारहाण केली. तसेच या अपघातामुळे प्रचंड धास्तावलेल्या प्रवाशांनी, तासगाव आगाराने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.