

सांगली : शहरातील विष्णुघाट आणि विश्रामबाग परिसरातील दोन वेगवेगळ्या अपार्टमेंट्समधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी सांगली शहर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना विष्णुघाट पोलिस चौकीजवळील गिरिजा अपार्टमेंटमध्ये १४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीनच्या सुमारास घडली. संदीप विष्णू यमगर (वय ४२) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्याने चौथ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅट क्रमांक ११ चे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरीतील सात भार वजनाचे चांदीचे पैंजण, एक भार वजनाच्या कानातील रिंगा, एक भार वजनाचा करदोडा आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबवला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
दुसरी घटना हसनी आश्रम मेन रोडवरील गव्हर्न्मेंट कॉलनीतील साईविश्वास अपार्टमेंटमध्ये १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते रात्री सव्वानऊच्या दरम्यान घडली. चोरट्याने गौरव मंगेश जप्तीवाले (वय ३८) यांच्या फ्लॅट क्रमांक ३०१ मधील ३५ ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, १० ग्रॅमचा नेकलेस, ५ ग्रॅमची कर्णफुले, ४ ग्रॅमचे वेढण, चांदीची नाणी व ३८ हजार रुपये रोख असा १ लाख ६५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल चोरला. तसेच त्यांचे शेजारी दामोदर विठ्ठलराव मुधाळे (वय ७१) यांच्या फ्लॅट क्रमांक २०१ चे कुलूप तोडून ८ ग्रॅमची दोन मणीमंगळसूत्रे, ९ ग्रॅमची सोन्याची पाने, १० ग्रॅमचा नेकलेस, २ ग्रॅमची कर्णफुले, ९ ग्रॅमची चेन, चांदीची चेन, पूजेचे साहित्य आणि २५ हजार रुपये रोख असा १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला.