

बुधगाव : येथील ग्रामदैवत सिद्धेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात झाली. पाकाळ पूजेनंतर बुधवारी रात्री रणवाद्यांच्या गजरात चांदीच्या पालखीतून श्रींची ग्रामप्रदक्षणा झाली. यावेळी पालखी मार्गावर विद्युत रोषणाई करून रांगोळ्या काढून आकर्षक आतषबाजी करण्यात आली.
चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीपासून बुधगाव, कवलापूर आणि माधवनगर येथे श्रीसिद्धेश्वर यात्रेस सुरुवात झाली. यात्रेनिमित्त धनगरी ढोलवादन स्पर्धा, कीर्तनाची जुगलबंदी तसेच गावाची शाहिरी परंपरा जपत ही रात्र शाहिरांची आणि शिवचरित्रावर आधारित श्रीमानयोगी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भव्य कुस्ती मैदान आणि बैलगाडी शर्यतीने यात्रेच्या वातावरणात जोश निर्माण झाला. पालखी मार्ग फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत आतषबाजीत पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करत सात दिवस चाललेल्या यात्रेची सांगता करण्यात आली.