

बोरगाव : पुसेसावळी-वाकुर्डे रस्त्यावर बोरगाव (ता. वाळवा) नजिक दोन दुचाकींच्या धडकेत श्रीकांत आनंदराव कदम (वय ३७, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार, दि. ८ रोजी दुपारी घडला. याप्रकरणी दुचाकी चालक हर्षवर्धन सचिन पाटील (रा. बोरगाव) याच्याविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीकांत यांचे भाऊ रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत कदम हे रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच ०९ एएन ८९५९) तांबवे येथे चालले होते. बोरगाव येथील जयवंतकाका चौकात आले असता खुंदलापूरच्या बाजूने आलेल्या हर्षवर्धन पाटील याच्या दुचाकीने (क्र. एमएच १० ई एक्स ८९०२) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत श्रीकांत रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी श्रीकांत यांना तातडीने ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
तीन दिवसात दोन अपघाती मृत्यू
श्रीकांत कदम हे डफळापूर येथील एका कारखान्यात विद्युत विभागात कार्यरत होते. रविवारी सकाळी ते दुचाकीवरुन तांबवे येथील नातेवाईकांना दिवाळी फराळ देण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला. दोनच दिवसापूर्वी माहेरी दिवाळी देऊन दुचाकीवरून घरी परतत असताना पूनम चव्हाण या विवाहितेचा ताकारी येथे अपघातात मृत्यू झाला होता.
गतिरोधकाच्या मागणीकडे दुर्लक्ष
जयवंतकाका चौकात गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव वेगाने जातात. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार गतिरोधक बसवण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गतिरोधक असता तर हा अपघात टळला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया घटनास्थळी व्यक्त होत होती.