

तासगाव : बोरगाव (ता. तासगाव) येथे जमिनीच्या जुन्या वादातून ३६ वर्षीय शेतकऱ्यावर चाकूने वार करण्यात आला. मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या भाच्यालाही दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपतराव तानाजी पाटील (वय ३६, रा. बोरगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून शंकर बाबुराव पाटील, संग्राम बाबुराव पाटील, संतोष बाबुराव पाटील आणि उदय आबासाहेब पाटील (सर्व रा. बोरगाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी आणि संशयित हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्या भावकीत जमिनीचा वाद सुरू आहे. सोमवारी सकाळी बोरगावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी फोन करून ग्रामपंचायतीमध्ये बोलावल्याने संपतराव पाटील तेथे गेले होते. तिथे संशयितही उपस्थित होते. त्या ठिकाणी जमिनीवरून आणि घराच्या अतिक्रमणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संपतराव तिथून निघून आले.
दरम्यान, काही वेळानंतर बोरगाव येथील स्टॅण्ड चौक आणि म्हसोबा मंदिर परिसरात संशयितांनी संपतराव यांना गाठून पुन्हा वाद घातला. यादरम्यान शंकर पाटील याने संपतराव यांच्या हातावर चाकूने वार केला, तर अन्य संशयितांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेला फिर्यादीचा भाचा अनिल बाबासाहेब जाधव याला संग्राम पाटील याने जमिनीवरील दगड उचलून कमरेवर मारल्याने तो जखमी झाला. तसेच उदय पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेनही गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.