

जत : निगडी खुर्द (ता. जत) येथील जंगलवस्ती परिसरात चार चोरट्यांनी पावणे दोन लाख किमतीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार लक्षात येतात ग्रामस्थांनी तीन चोरट्यांना पाठलाग पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. दरम्यान मुख्य मोरक्या दागिने घेऊन पळून गेला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा जत पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जत-येळवी राज्यमार्गालगत निगडी खुर्द गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर अडीचशे लोकवस्ती असलेली जंगलवस्ती आहे. बुधवारी सकाळी दोन मोटारसायकलीवरून दोन महिला व दोघे पुरुष जंगली वस्तीवर आले. रस्त्यालगत असलेल्या पिकशेडजवळ मोटारसायकली लावून वस्तीत प्रवेश केला. वस्तीच्या मध्यभागी असलेल्या बंदेनवाज शेख यांच्या घरासमोर थांबले. त्यांच्या घरातील इतर मंडळी बाहेर गेली होती. तर बंदेनवाज यांच्या पत्नी जनावरे राखत होत्या.
घराचे दार उघडे होते, तसेच घरात कोणी नसल्याचे पाहून पाठीमागील बाजूने चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातील साडेतीन तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्याचवेळी बंदेनवाज यांच्या पत्नी घरात आल्या. त्यांना हिसडा देऊन चोरटे पळाले. संबंधित महिलेने आरडाओरडा करताच वस्तीवरील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. झटापट करीत दोन महिला व एका चोरट्याला ग्रामस्थांनी पकडले. मात्र त्यांचा मोरक्या दागिने घेऊन मोटारसायकलीवरून पळून गेला. वस्तीवरील ग्रामस्थांनी जत पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.