

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने जिल्हा निवडणूक प्रमुख, जिल्हा निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती केली आहे. सांगली जिल्ह्यासाठी आमदार सुरेश खाडे निवडणूक प्रभारी आहेत. ग्रामीण जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून सत्यजित देशमुख यांची, तर सांगली शहर निवडणूक प्रमुख म्हणून शेखर इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. आ. खाडे यांना सांगली जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. सांगली शहर निवडणूक प्रमुख म्हणून प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती तयार करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि प्रचार मोहीम प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील निवडणुकीची जबाबदारी आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.