Sangli Politics : सांगलीत भाजपला गटबाजीचा विळखा

महापालिकेत सत्तेत असूनही अस्वस्थता : शहरात आमदार-इनामदार गटबाजी जोरात
Sangli Politics
सांगलीत भाजपला गटबाजीचा विळखा
Published on
Updated on

उध्दव पाटील

सांगली : काँग्रेस म्हणजे महासागर..! एखादा फुटला, नाराज असला तरी काही फरक पडत नाही. गट-तट म्हणजे तर पक्षातील जिवंतपणाचं लक्षण..!, अशी जणू भलावण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करायचे. आता भाजपमध्येही तसंच काहीसं दिसत आहे. भाजप म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता. गर्दी वाढली की खांद्याला खांदा लागणार..तेव्हा पक्षात थोडी कुरबुर असणार..!, भाजपमध्ये पक्षातल्या गटबाजीवर असं पांघरूण घातलं जात आहे. पण त्याचा परिणाम पक्षावर व त्याहीपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांवर अधिक होत आहे. सांगली शहरात सध्या भाजपमध्ये आमदार-इनामदार ही गटबाजी जोरात आहे. महापालिकेत महापौर आणि स्थायी सभापती हे या दोन गटांची दोन रुपं आहेत. महापालिकेत सत्तेत असूनही भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

सत्तेच्या जवळ असलेल्या पक्षात गटबाजी वाढते, हे राजकारणातील जुने सूत्र आहे. सत्तेतील सहभाग, पदांची स्पर्धा, स्थानिक नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा आणि वाढलेले इनकमिंग या सगळ्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत तणाव वाढतच चालला आहे. गर्दी वाढली की खांद्याला खांदा लागतो, हे खरे; पण सांगलीत तो खांदा आता धक्का देताना दिसतोय.

सांगली महानगरपालिकेतील चित्र तर या गटबाजीचे सर्वात ठळक उदाहरण आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापती हे दोन वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधी असल्याचे स्पष्टपणे जाणवते. महापौर निवडीच्या वेळी एक गट अनुपस्थित राहतो, तर स्थायी सभापती निवडीत हा एक प्रकारचा शक्तिप्रदर्शनाचा राजकीय संदेश असतो. त्याचा अर्थ कार्यकर्ते, नागरिक आपआपल्यापरिने लावत असतात.

सभापती मुंबईत; महापौर सांगलीत

राजकारणात अनेकदा अनुपस्थिती हीच सर्वात मोठी भाषा असते. ती न बोलताही ऐकू येते. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी यांची अनुपस्थिती, तर भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमादिवशी आमदार सुधीर गाडगीळ, स्थायी समिती सभापती अतुल माने मुंबईत मंत्रालयात आणि त्यांच्या एकूणच सर्व गटांची अनुपस्थिती खूप काही सांगून जाते. महापालिका क्षेत्राचे प्रलंबित प्रश्न, योजना, कामे मार्गी लावण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मुंबई दौरे सुरू आहेत, पण नेमके या दौऱ्यात महापौर नाहीत, पण स्थायी सभापती आहेत. हे सगळे संकेत स्पष्ट सांगतात की, गटबाजी आता पृष्ठभागावर तरळत नाही, तर ती खोलवर भिनली आहे.

ठेच लागली, अंगठा फुटता फटता वाचला, पण...!

खरेतर भाजपमधील गटबाजीचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून आला. भाजपला 50-55 जागांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 39 जागांवर समाधान मानावे लागले. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे उमेदवारी वाटपातील गोंधळ. पक्ष म्हणून एकत्रित रणनीती आखण्याऐवजी, प्रत्येक गटाला जागा देण्याचा प्रयत्न झाला. परिणामी, विनिंग मेरिट, पक्षनिष्ठेपेक्षा गटनिष्ठा महत्त्वाची ठरली. त्याचा फटका बसला. ठेच लागली, पायाचा अंगठा फुटता फुटता वाचला.. पण यातून काही धडा घेतल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news