

तासगाव : बिरणवाडी (ता. तासगाव) येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावत पोलिसांनी सुमारे १९ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड हस्तगत केली. न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल संबंधित फिर्यादी मधुकर काशिनाथ मोरे यांना परत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिरणवाडी येथील मधुकर मोरे हे व्यवसायानिमित्त बाहेर असतात. त्यांचे घर बंद असल्याने दि. २ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून घरात प्रवेश केला. घरात आढळून आलेली १११ किलो वजनाची तिजोरीच चोरट्यांनी लंपास केली. त्या तिजोरीत १ लाख ३३ हजार रुपये रोख रकमेसह २७ लाख २४ हजार ८२० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू होत्या. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना नितीन खंडू यलमार (रा. मतकुणकी), अक्षय ऊर्फ नागेश बाबासाहेब बुधावले (रा. बलगवडे) आणि उमाजी भीमसेन गुजले (रा. बलगवडे) या तिघांवर संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनीच ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुधवारी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याहस्ते हा मुद्देमाल मधुकर मोरे यांना देण्यात आला. तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक संजीव झाडे, विशाल टकले व तपास पथकाने ही कारवाई केली.
‘काम फत्ते’चा संदेशच ठरला धागा
या प्रकरणाचा तपास करताना बिरणवाडी येथील मोरे यांच्या घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी कोणाचे फोनकॉल झाले आहेत का, याची पोलिसांनी पडताळणी केली. त्यावेळी त्या वेळेत मोबाईलवरून एकच संदेश पाठवला गेल्याचे आढळून आले. याच संदेशावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले.
तिजोरी ठेवली पाण्याच्या पाईपमध्ये
मोरे यांच्या घरी चोरी केल्यानंतर संशयितांनी चक्क १११ किलोची तिजोरीच पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. बलगवडे ते वायफळे परिसरात बंद असलेल्या एका पाण्याच्या पाईपमध्ये चोरट्यांनी ही तिजोरी लपवून ठेवली होती. कोणाचाही संशय येऊ नये, अशा पद्धतीने तिजोरी लपवण्यात आली होती.