Sangli News : बिळूर येथे ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी रास्ता रोको

खरिपाची नुकसान भरपाई देण्याची मागणी
Sangli News
बिळूर येथे ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी रास्ता रोको
Published on
Updated on

जत : जत तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरिपाचा पेरा वाया गेला आहे. याचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने दक्षिण भागात सोडावे, या मागण्यांसाठी बिळूर येथील शेतकऱ्यांनी मंगळवेढा-ऐगेळी महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले.

ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी सुमारे ६५ हजार एकरांवर पेरणी केली होती; मात्र पावसाअभावी पिके करपून गेल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.

जतच्या दक्षिण भागात ८० टक्के बागायत क्षेत्र असून पाऊस नसल्याने विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत, तर तलाव आटले आहेत. येत्या काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने सोडून तलाव भरून घ्यावेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने तातडीने चारा छावण्या किंवा डेपो सुरू करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात ॲड. बसवराज धोडमनी, श्रीशैल्य कोटगोंड, बसवराज घेज्जी, रवी पाटील, बाबा पाटील, रामन्ना सिद्धनाथ, रमेश कामगोंड, विठ्ठल धोडमनी, मल्लिकार्जुन घेज्जी, महादेव धोडमनी, महादेव जाबगोंड, बसवराज धोडमनी, रावसाहेब धोडमनी, परशराम बेळुंखी, मुरग्याप्पा धोडमनी, शिवानंद धोडमाळ आदी शेतकरी उपस्थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि नागरिक पाण्याच्या शोधात आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ॲड. बसवराज धोडमनी यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news