Sangli Accident: करंजे येथे मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मृत तासगावचा; सहप्रवासी गंभीर जखमी
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

विटा : भिवघाट-तासगाव रस्त्यावरील करंजे (ता. खानापूर) गावच्या हद्दीत मोटार आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाला. प्रशांत रामचंद्र रेंदाळकर (वय 36, रा. वरची गल्ली, तासगाव) असे मृताचे नाव आहे, तर उमाजी बाळासाहेब मंडले (रा. हातनूर, ता. तासगाव) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी करंजे गावाजवळील सूर्यवंशी मळा परिसरात घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तासगाव येथील रहिवासी असलेले व्यावसायिक सुनील उत्तम बनसोडे (वय 38) हे मोटारीतून (क्र. एमएच 10 ईके 5983) भिवघाट ते तासगाव रस्त्याने चालले होते. मोटार सूर्यवंशी मळ्याजवळ आली असता, समोरील बाजूकडून म्हणजेच तासगावकडून भिवघाटच्या दिशेने प्रशांत रेंदाळकर हे दुचाकीवरून (क्र. एमएच 10 सीके 5803) येत होते. त्यांच्या दुचाकीने मोटारीस समोरासमोर डाव्या बाजूला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालक प्रशांत रेंदाळकर हे रस्त्यावर कोसळले. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले उमाजी मंडले जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खानापूरचे पोलिस हवालदार पी. एस. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. विट्याचे पोलिस उपनिरीक्षक विशाल मेळेकर तपास करत आहेत.

कर्ता पुरुष हरपला!

प्रशांत रेंदाळकर हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष होते. प्रशांत लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या तीन बहिणी विवाहित असून त्यापैकी एका बहिणीचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. घरात प्रशांत आणि त्यांची वृद्ध आई दोघेच राहत होते. प्रशांत विवाहित असून त्यांना एक लहान मुलगा आहे, मात्र सध्या त्यांची पत्नी व मुलगा माहेरी राहत होते. प्रशांत यांच्या अकाली जाण्याने रेंदाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news