

नागज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी पुलाजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आदम ताजुद्दीन मणेरी (वय ४२, रा. हंगीरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदम मणेरी हे मिरजहून पंढरपूरच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केरेवाडी पुलाजवळ ते आले असता, पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले, तर दुचाकीवरील अन्य एक जखमी झाला. उपचारादरम्यान मणेरी यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.