Sangli Accident News | भोसेत दोन मोटारींची धडक; दोघांचा मृत्यू
मिरज : मिरज-पंढरपूर रोडवरील भोसे फाटा येथे झालेल्या दोन मोटारींच्या भीषण अपघातात कुपवाड येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. 17 रोजी मध्यरात्री घडली. अनिकेत निवृत्ती एकल (वय 24) आणि राजेश गोकुळराव जाधव (26, दोघेही रा. बजरंगनगर, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोटार घेऊन जाणार्या अनिकेत व राजेश यांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. ताबा सुटल्याने त्यांची मोटार रस्त्याच्या दुसर्या बाजूला जाऊन समोरून आलेल्या मोटारीस धडकली. या अपघातात अनिकेत एकल आणि राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, एकाचा मृतदेह रस्त्यावर, तर दुसरा मृतदेह हा चक्काचूर झालेल्या मोटारीतच अडकला होता.अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस तसेच आपत्कालीन सेवा देणारे महादेव वनखंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन मृतदेह मोटारीबाहेर काढला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे मिरज ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले.

