Sangli Crime : लूट कितीची? पोलिसांनाच ठावूक नाही!

एसपी सांगतात २० लाख; ठाण्यात ९ लाखांची नोंद असल्याची चर्चा; ३० लाख रोख व पाच तोळे सोन्याचीही चर्चा
Robbery Case
Robbery CasePudhari
Published on
Updated on

जत : भिवर्गी फाटा परिसरात तमिळनाडूतील मेंढी व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याच्या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. सात ते आठ जणांनी कारमधून येऊन व्यापाऱ्यांना अडवून लुटल्याचा आरोप आहे. घटना गंभीर असतानाच आता या प्रकरणातील लुटीच्या मुद्देमालाच्या आकड्यांवरूनच पोलिस यंत्रणेत ताळमेळ नसल्याचे चित्र समोर येत आहे.

सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, व्यापाऱ्यांकडून सुमारे २० लाख रुपये रोख, दोन तोळे सोन्याची चेन आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल लुटण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून ही लूट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र उमदी पोलिस ठाण्यातील नोंदीबाबत वेगळी माहिती चर्चेत आहे. सुमारे ९ लाख रुपये रोख आणि २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा मुद्देमाल नोंदवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एसपींची माहिती आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील नोंद यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे स्थानिक पातळीवर ३० लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम आणि पाच तोळे सोन्याची चैन लुटल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय, हा प्रश्न आहेच.

दरोडा मोठा, की नोंद छोटी?

एका गंभीर लुटीप्रकरणात फिर्याद, गुन्ह्याची नोंद, पंचनामा आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची माहिती यामध्ये एकवाक्यता असणे अपेक्षित असते. मात्र येथेच आकड्यांमध्ये फरक पडत असेल, तर तपासाची दिशा आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. नेमकी रक्कम किती? सोन्याचे वजन किती? मोबाईल किती? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळणे आवश्यक आहे. जर २० लाख रुपयांची लूट झाली असेल तर ९ लाखांची नोंद का? आणि जर ९ लाखांचीच लूट झाली असेल, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून २० लाखांची माहिती कशी आली? ३० लाख रुपयांच्या चर्चेचे मूळ काय? पाच तोळे सोन्याची चर्चा कुठून आली? या सर्व बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे.

व्यापारी बाहेरचे; मग तपास अधिक काटेकोर हवा

तमिळनाडूतील व्यापारी जत तालुक्यात माडग्याळ शेळ्या-मेंढ्या बाजारात मेंढी व्यवसायासाठी दर आठवड्याला येत असतात. परराज्यातील व्यापाऱ्यांवर अशा पद्धतीने बंदुकीचा धाक दाखवून लूट झाल्याचा आरोप असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news