Sangli Accident : भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिलवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद
 Sangli Accident News
भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on
Updated on

भिलवडी : पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडीकडून माळवाडीकडे घरी जात असताना, अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अजय अशोक कदम (वय 37, रा. माळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनाने अजय यांना सुमारे 20 फूट फरफटत नेल्याने त्यांचा जागीच अंत झाला.

अजय कदम हे झाडावरील नारळ काढण्याचा व्यवसाय करत होते. शनिवारी सायंकाळी ते आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. एमएच 10 सीएस 150) काम संपवून घराकडे निघाले होते. स्वागत हॉटेलजवळ आल्यानंतर अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अजय हे त्या वाहनामध्ये अडकून सुमारे 20 फूट फरफटत गेले. उजव्या हाताला आणि तोंडाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून हॉटेलमधील ग्राहक आणि परिसरातील रहिवासी घटनास्थळी धावले. मात्र संबंधित अज्ञात वाहनचालक तिथून वेगाने पसार झाला. रस्त्यावर रक्ताचा अक्षरशः सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे व रोहिदास पावसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अजय कदम हे अविवाहित होते. त्यांच्या अपघाती निधनाने माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. अपघाताच्या ठिकाणी असलेल्या हॉटेल्स आणि व्यावसायिकांनी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहेत. रात्री उशिरा भिलवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news