

भिलवडी : भिलवडी-माळवाडी रस्त्यावरील हायस्कूल रोड परिसरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच दुकाने लक्ष्य केली. यातील तीन दुकानांतून 41 हजार रुपयांची रोकड आणि मुद्देमाल लंपास केला असून, दोन दुकानांत चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने ही चोरी केल्याचे दिसून येत आहे. सर्वप्रथम परिसरातील डीपीमधून वीज पुरवठा खंडित करून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेतला. ही सर्व दुकाने पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने, चोरट्यांनी मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. ही घटना शनिवारी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.शिरोटे ड्रायफ्रूट फॅक्टरी या दुकानातून काउंटरमधील 35 हजार रुपये रोकड आणि ड्रायफ्रूटची महागडी पाकिटे चोरीला गेली आहेत. बाहुबली टेक्स्टाईल या दुकानातून नामवंत कंपन्यांचे तयार कपडे चोरट्यांनी पळवले. श्री ऑटो सर्व्हिसेस या दुकानातूनही रोकड लंपास करण्यात आली. याव्यतिरिक्त मोरया सर्व्हिसिंग सेंटर आणि पारस कृषी सेवा केंद्र या दोन दुकानांत चोरीचा प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
याप्रकरणी नारायण पाटील, संतोष राजोबा, उमेश शिंदे आणि शांतिनाथ शेडबाळकर यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने भिलवडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
दोन दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे दिसून येत आहेत. त्यांनी ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले होते. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान पालवे व रोहिदास पावसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.