

इस्लामपूर : ताकारी-कराड रस्त्यावर भवानीनगर (ता. वाळवा) नजीक दुचाकीला समोरून कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पांडुरंग बाळू चव्हाण (वय 70, रा. तांदळगाव, ता. खानापूर) हे ठार झाले, तर पांडुरंग यांचा मुलगा आगाशिव चव्हाण (वय 44) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी कार चालक साहिल रफिक मुलाणी (रा. शामरावनगर, कुपवाड, सांगली) या संशयितावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आगाशिव चव्हाण व पांडुरंग चव्हाण हे दुचाकीवरून (एमएच 10, सीए 7826) वरून ताकारीहून कराडकडे निघाले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास भवानीनगरनजीक कराडकडून आलेल्या कारने आगाशिव यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत पांडुरंग चव्हाण हे रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर आगाशिव हे गंभीर जखमी झाले. कार रस्त्याकडेच्या ओढ्यात पडली. कारमधील साहिल, त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाले. पांडुरंग, आगाशिव यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री पांडुरंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामदास सरोदे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस तपास करत आहेत.