Shaktipeeth Highway : भाळवणीत शेतकऱ्यांचा एल्गार

‘शक्तिपीठ’ मोजणी चौथ्या दिवशीही उधळली; नेतृत्व करणाऱ्यांची धरपकड; आंदोलकांचा संताप
Shaktipeeth Highway : भाळवणीत शेतकऱ्यांचा एल्गार
Published on: 
Updated on: 

विटा : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाची जमीन मोजणी गुरुवारी (दि. २६) सलग चौथ्या दिवशी शेतकरी आणि आंदोलकांनी बंद पाडली. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे शेतकरी आणि पोलिस प्रशासन यांच्यात झालेल्या झटापटीत काहीजणांना मार बसला, तर काहींना ताब्यात घेण्यात आले. अखेर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे मोजणी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी जाहीर केला.

भाळवणी गावाच्या परिसरातील मुल्लानगर आणि घोळ मळा भागात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात प्रशासन दाखल झाले. मात्र, शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत मोजणी बंद पाडली. विरोध करणाऱ्या व नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले; तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मोजणी होऊ शकली नाही. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गेल्या तीन दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस फौजफाटा माहुली, चिखलहोळ, भाग्यनगर, घानवड, नेवरी आणि भाळवणी येथे मोजणीसाठी जात आहे; मात्र सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बुधवारी भाळवणीत झालेल्या विरोधानंतर गुरुवारी पुन्हा मोजणी पथक येताच महिला शेतकरी मोठ्या संख्येने पुढे सरसावल्या. जमिनी गेल्यावर आम्ही जगायचे कसे, हवे तर आमच्या पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका, असा टाहो महिलांनी फोडल्यानंतर वातावरण भावूक झाले.

या तणावादरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात नेले. मोजणी यंत्राकडे शेतकऱ्यांनी धाव घेतल्यानंतर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर पोलिसांनी मोजणीचे मशीन ताब्यात घेऊन वाहनात सुरक्षित ठेवले. दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षानंतर घोळ मळ्यात मोजणीचा प्रयत्न करण्यात आला; परंतु शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तोही फसला.

या आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड, सयाजी धनवडे, पंडित कोळेकर, तानाजी धनवडे, सुरेखा जाधव, राजकुमार जगताप, विद्याधर महाडिक, अमोल महाडिक यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.