सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज हिंदूंच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. अखंड हिंदुस्थानच्या भावना भगव्या ध्वजाशी निगडित आहेत. संत, महंतांचे नाते या भगव्याशी आहे. भक्तिभावाचे नाते भगव्याशी आहे. सांगलीत आज फडकलेला हा भगवा ध्वज संपूर्ण राज्याला नवी ऊर्जा देईल, असे उद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले.
येथील श्रीराम मंदिर चौकात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान आयोजित देवदर्शन पदयात्रा स्वागत व शंभरफुटी भगवा ध्वजारोहणाचा सोहळा सोमवारी दिमाखात झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने वातावरण चैतन्यमय बनले. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेविका स्वाती शिंदे, तसेच शिवप्रतिष्ठानचे अविनाश सावंत यांच्याहस्ते व मंत्रोच्चारात शंभरफुटी श्रीराम स्तंभावर भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर सारडा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे-पाटील, माजी नगरसेविका सुनंदा राऊत, सुजित राऊत, राहुलसिंह ढोपे-पाटील आदी उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला फार महत्त्व आहे. राज्यभर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला. यापुढे शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा. सांगलीत शंभरफुटी भगवा ध्वज उभारण्याचे काम माजी आमदार नितीन शिंदे व स्वाती शिंदे यांनी मोठ्या निष्ठेने व तडफेने केले आहे. त्यांच्या या कार्यात काहींनी अडचण आणली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने इथे भगवा ध्वज फडकत आहे. धर्माच्या आड येणार्यांच्या विरोधात माझी भूमिका यापुढेही राहील. नितीन शिंदे म्हणाले, सांगलीत राममंदिर चौकात भगवा ध्वज उभारण्यास काहींनी अडचण आणली. पोलिस व प्रशासनाने काम थांबवले. पालकमंत्री यांनाही चुकीची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते निदर्शनास आणावे लागले. आता या भगव्या ध्वजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिल्यास पुरता बंदोबस्त करू.