

मिरज : मिरजेमध्ये पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोने लांबवणाऱ्या बिहारी चोरट्यांनी मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एका वृद्ध महिलेला गंडा दिल्याचे समोर आले आहे. उषाताई बबनराव गायकवाड (रा. बेळंकी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुर्गेश कुमार कृष्णकुमार गुप्ता (वय २९) आणि देवेंद्रकुमार नरेशकुमार गुप्ता (वय ३६, दोघे रा. खगडिया, बिहार) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ९२ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.
यापूर्वी या चोरट्यांनी मिरजेतील एका ६० वर्षीय महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक केली होती. त्यांच्याकडे पोलिसी चौकशी सुरू असताना त्यांनी बेळंकी येथील उषाताई गायकवाड यांच्यासोबतही असाच प्रकार केल्याची कबुली दिली.
संशयित दि. १२ रोजी दुपारी उषाताई गायकवाड यांच्या घरी गेले होते. तांब्याची भांडी व सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने त्यांनी उषाताई यांच्याकडून सोन्याचे दागिने घेतले आणि ते पिवळ्या रंगाच्या द्रव्यात उकळवले. त्यानंतर त्यातील १५ ग्रॅम वजनाचे वितळलेले सोने घेऊन ते पसार झाले होते. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.