

सांगली ः बँक खात्यातील एफडी म्हणजे मुदतठेवी आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सायबर भामट्यांनी थेट बँक खात्यांवरच नव्हे, तर एफडीवरही डल्ला मारायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, ओटीपी (वन टाईम पासवर्ड) न मागवता किंवा कोणतीही माहिती न विचारता, केवळ मोबाईल अॅप, थर्ड पार्टी अॅक्सेस किंवा सोशल मीडिया हॅक करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. सांगलीतील खासगी बँकेतील एका ज्येष्ठ ग्राहकांबाबत हा गंभीर प्रकार घडला आहे.
काही महिन्यांपूर्वी सांगलीतील व्यापारी अरुण वासुदेव कुलकर्णी यांच्या मोबाईलमधील सोशल मीडिया खाते हॅक करण्यात आले. यामुळे त्यांचा मोबाईल बंद पडला. त्यांनी मोबाईल सुरू केला, तेव्हा त्यांच्या बँक खात्यातील 58 हजार 500 रुपयांची रक्कम काढल्याचा मेसेज आला. वास्तविक कुलकर्णी तेव्हा प्रवासात होते. त्यांनाही हा व्यवहार संशयास्पद वाटला. त्यांनी तत्काळ आपल्या बँकेकडे विचारणा केली. तेव्हा बचत खात्यातून 7 लाख 59 हजार काढल्याचे समजले. यामध्ये दोन ऑफलाईन एफडी मोडून सायबर भामट्यांनी रक्कम हडपली होती. विशेष म्हणजे कुलकर्णी यांनी कोणताही ओटीपी, आयडी, पासवर्ड शेअर केला नव्हता. तरीही त्यांच्या खात्यातून लाखो रुपयांवर भामट्यांनी डल्ला मारला. ऑफलाईन एफडी असताना ती ऑनलाईन पध्दतीने मोडून भामट्यांनी डल्ला मारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यांनी बँकेकडे तक्रार केली, पण बँकेने हात वर केले आहेत.
सायबर भामटे आता बँकांच्या डिजिटल प्रणालीतील त्रुटी किंवा थर्ड पार्टी अॅप्समधून मिळालेली माहिती वापरून, ग्राहकांचे केवायसी अपडेट, मोबाईल अॅप लॉगिन व ई-एफडी डेटा मिळवून सगळा व्यवहार करत आहेत. त्यामुळे बँकेत गुंतवणूक करणार्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.
एफडीसारख्या पारंपरिक, सुरक्षित मानल्या जाणार्या गुंतवणुकीवरही सायबर भामटे घाला घालत असतील, तर नागरिकांनी आर्थिक व्यवहार अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक बनले आहे. सांगलीत कुलकर्णी यांच्याबाबत घडलेला प्रकार निश्चितच गंभीर आहे. त्यामुळे एफडी सुरक्षित आहे का? असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.