

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रवींद्र धोंडिराम माळी (वय 34, रा. बामणोली. ता. मिरज), प्रमोद माने, अविनाश देशमुख हे तिघे गंभीर जखमी झाले.
आनंद राजू यमगर, अजय शेळके, विकास लक्ष्मण जाधव, राहुल विठ्ठल चव्हाण (सर्व रा. बामणोली, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने या घटनेतील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून हल्ल्यातील चार एडके, लाकडी दांडके जप्त केले आहे.फरारी संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.
बामणोली येथील दत्तनगर भागातील एका कंपनीच्या कोपऱ्यावर मंगळवार, दि. 24 रोजी दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रवींद्र माळी व त्याचे मित्र प्रमोद माने व अविनाश देशमुख थांबले होते. या तिघांचे संशयित विकास जाधव याच्याबरोबर दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. या रागातून संशयित आनंद यमगर, अजय शेळके, विकास जाधव, राहुल चव्हाण या चौघांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील धारदार एडक्याने व लाकडी दांडक्याने रवींद्र माळी, प्रमोद माने, अविनाश देशमुख या तिघांवर प्राणघातक हल्ला केला. ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर संशयित हत्यारे तेथेच टाकून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित दोघांना ताब्यात घेतले. चार एडके व लाकडी दांडके जप्त केले. जखमी रवींद्र माळी याने कुपवाड पोलिसात तक्रार दिली आहे.