Sangli Election Boycott : वृक्षतोडीच्या निषेधार्थ बलगवडे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मतदारांनी फिरवली पाठ; ग्रामस्थांची समजूत काढण्यात प्रशासनास अपयश
Sangli Election Boycott
वृक्षतोडीच्या निषेधार्थ बलगवडे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
Published on
Updated on

मांजर्डे : गावातील गायरान क्षेत्रातील हजारो झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याच्या निषेधार्थ, बलगवडे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर शनिवारी बहिष्कार टाकला. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी फसवणूक केल्याची भावना व्यक्त करत, 2195 मतदारांपैकी एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बलगवडे हे मतदानावर बहिष्कार टाकणारे एकमेव गाव ठरले असून, प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे.

बलगवडे येथील गट क्रमांक 180 व 181 मधील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 12 ते 15 हजार झाडे तोडण्यात आली. या वृक्षतोडीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता. पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणही केले होते. त्यावेळी प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी ‌‘वृक्षतोड न करता अन्य ठिकाणी प्रकल्प करू‌’ असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत कंपनीने पोलिस संरक्षणात वृक्षतोड सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

ग्रामसभेने सरपंच हणमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मतदानावर बहिष्काराचा एकमुखी ठराव घेतला होता. निवडणुका जाहीर झाल्यावर तहसीलदार अतुल पाटोळे व गुन्हे अन्वेषण विभागाचे संजीव झाडे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शनिवारी मतदानाच्या दिवशी तीनही मतदान केंद्रांवर कर्मचारी यंत्रणेसह सज्ज होते, मात्र दिवसभरात एकही मतदार मतदानासाठी फिरकला नाही.

विधानसभा निवडणुकीत गटातटाचे राजकारण आणि इर्षा पाहणाऱ्या या गावात, ग्रामविकासाच्या आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावर मात्र सर्व गट-तट विसरून नागरिक एकत्र आले. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही आणि पोलीस बळाचा वापर करून वृक्षतोड केली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news