Sangli Bank Fraud : बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेच्या विटा शाखेत ५० लाखांची फसवणूक

गहाण जमीन परस्पर विकल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल
Bank Fraud
Bank FraudPudhari News Network
Published on: 
Updated on: 

विटा : आटपाडी येथील ‘दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँके’च्या विटा शाखेची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विट्यातील पती-पत्नीविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडे गहाण ठेवलेली जमीन कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर दुसऱ्यास विकून बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

धनाजी उत्तम शिंदे व लता धनाजी शिंदे (दोघे रा. कराड रोड, विटा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी बँक अधिकारी काकासाहेब आनंदा काकडे यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित धनाजी शिंदे आणि लता शिंदे यांनी बँकेकडून घरतारण दीर्घ मुदत कर्ज व शेतीपूरक कर्ज असे मिळून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या तारणपोटी त्यांनी विटा येथील गट क्रमांक ७/१/१ मधील स्वतःच्या मालकीची जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती. या गहाणखताची नोंद ७/१२ उताऱ्यावरही करण्यात आली होती.

दरम्यान, कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी संशयितांनी बँकेची कोणतीही परवानगी न घेता ही तारण जमीन १९ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रज्वला विशाल निकम यांना परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले. जमीन विकून आलेली रक्कमही बँकेत जमा न करता त्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतली.

बँकेने वारंवार नोटिसा देऊनही कर्जदारांनी थकीत रक्कम भरली नाही. ३१ ऑगस्ट २०१९ अखेर दोन्ही कर्जांची मिळून ४१ लाख ४९ हजार ४५५ रुपये रक्कम थकीत आहे. ही रक्कम जाणीवपूर्वक न भरता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित पती-पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news