सांगली : वनविभाग कार्यालयातील हजेरीसह हालचाल रजिस्टर गायब
आटपाडी : आटपाडी वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक खाडे हे आपल्या कार्यालयात हजर नसतात. त्यामुळे पत्रकारांनी बुधवारी साहेब आले का नाहीत हे पाहण्यासाठी कार्यालय गाठले. पण साहेब काय जागेवर नव्हते.कर्मचाऱ्यांनी थोड्याच वेळात ते येतील असे सांगत वेळ मारून नेली.दरम्यान हजेरी पत्रक दाखवा म्हणताच त्यांनी कार्यालयात हजेरी पत्रकच नसल्याचे सांगितले.त्यामुळे पुन्हा एकदा या कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला.
माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी वनविभागाच्या कामाची नुकतीच पोलखोल केली.वनपरिक्षेत्र कार्यालय हे विविध घटनांनी चर्चेत आले आहे. बोगस कामे, बोगस मजूर दाखवणे, अन्य कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा तसेच अधिकारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याचा आरोपही करण्यात आला.
याबाबत शहानिशा करण्यासाठी पत्रकारांनी बुधवारी सकाळी ११: २० मिनिटांनी कार्यालय गाठले. पण वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक खाडे, वनपाल अस्मिता पाटील हे दोघेही हजर नव्हते. फक्त अन्य कर्मचारी हजर होते. त्यांना हजेरी व हालचाल रजिस्टर कोठे आहे असे विचारले असता त्यांनी आमच्याकडे कसलेच हजेरी आणि हालचाल रजिस्टरच नसल्याची कबुली दिली.
खाडे यांना फोन केला असता त्यांनी आटपाडी बसस्थानक वर असून कार्यालयात पंधरा ते वीस मिनिटांनी येणार असल्याचे सांगितले.बहुतांश शासकीय कार्यालयांतील कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसतात.
सांगली कार्यालयात किंवा भागात असल्याचे सांगत ते बाहेर फिरत असतात. हे वारंवार उघडकीस आले तरी वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यामुळे त्यांच्यावर प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही.वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आटपाडी कार्यालयाच्या या अनगोंदी कारभाराची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

