Sangli attack on police: पोलिस पथकावर हल्ला

तुरची फाट्याजवळील घटना; दगडफेकीत तीन कर्मचारी जखमी
Sangli attack on police: पोलिस पथकावर हल्ला
Published on
Updated on

तासगाव : नागाव कवठे (ता. तासगाव) येथील नागनाथ मंदिरातील चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या तासगाव पोलिसांच्या पथकावर तुरची फाटा (ता. तासगाव) येथील पारधी वस्तीत जमावाने अचानक दगडफेक केली. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी अशी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत, तर जयश्री शिवाजी चव्हाण, बबल्या पपल्या शिंदे, पूजा हिम्मत शिंदे, प्रशांत हिम्मत शिंदे (सर्व रा. तुरची फाटा, गायरान पारधी वस्ती), अरविंद राजू चव्हाण (रा. सांडगेवाडी) आणि मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण (रा. बिलंको, ता. जत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरात काही दिवसांपूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरीचा तपास तासगाव पोलिस करत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरची फाटा येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या काहींचा या चोरीत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याअनुषंगाने पोलिस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी मंगळवारी सकाळी तुरची फाटा येथे चौकशीसाठी गेले होते.

चौकशीदरम्यान संशयितांच्या घरात पोलिसांना कटावणी आणि तोंडाला बांधण्यात येणारे मास्क मिळून आले. हे साहित्य सीसीटीव्ही फुटेजमधील साहित्याशी मिळतेजुळते असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी बबल्या शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी जयश्री चव्हाण यांनी चौकशीत अडथळा आणत, ‌‘आमच्या लोकांची चौकशी करायची नाही‌’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली. जमावातील काहींनी पोलिसांना शिविगाळ करत संशयितांना ताब्यात घेण्यास विरोध केला.

दरम्यान, पोलिसांनी संशयितांना वाहनात बसवण्याचा प्रयत्न करताच जमावाने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक सुरू केली. यामुळे वाहनाची समोरील काच फुटली. तसेच एका महिलेने पोलिस कर्मचारी सुरेश भोसले यांच्या हाताला चावा घेतल्याचेही पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दगडफेकीत अमर सूर्यवंशी यांच्या छातीला दगड लागून ते जखमी झाले, तर संतोष माळी यांनाही दुखापत झाली.

पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच तासगाव पोलिस ठाण्यातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले, तर अन्य संशयित घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी जखमी पोलिस कर्मचारी सुरेश भोसले यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार संशयितांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news